‘नितीशजी तेजस्वीला आशीर्वाद द्या, बिहारमधून बाहेर पडा; भाजपची साथ सोडून आमच्यासोबत चला’

भोपाळ: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजप सोडून आमच्यासोबत चला, अशी ऑफर देऊ केली आहे.
नितीशजी बिहार तुमच्यासाठी आता लहान पडू लागलाय. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आले पाहिजे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नीतीला पायबंद घातला पाहिजे. त्यामुळे तुम्ही समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांसोबत आले पाहिजे. यावर जरुर विचार करा, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अमरवेलीप्रमाणे आहेत. ज्या झाडावर ही वेल लपेटली जाते ते झाड सुकून जाते आणि ही अमरवेल वाढत जाते. ही अमरवेल बिहारमध्ये वाढून देऊ नका. तुम्ही लालू प्रसाद यादव यांच्यासोबत अनेक आंदोलने आणि संघर्ष केलाय. त्यासाठी तुम्ही एकत्र तुरुंगातही गेला आहात. त्यामुळे आता भाजप आणि संघाची ही विचारधारा सोडून तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले आहे.






