जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे : चंद्रकांत मोकाटे

पुणे : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व मातोश्री जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रबोधन विचारधारा कोथरुडच्या वतीने रक्तदान महायज्ञाचे आयोजन छत्रपती श्री. शिवाजी महाराज स्मारक चौक, येथे करण्यात आले होते. या शिबिरात ७६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, प्रशांत बधे , शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सलग ९ वर्षे सुरु असलेल्या या रक्तदान महायज्ञ उपक्रमात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. ७६८ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करत कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला व सर्व सहभागी रक्तदाते व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
चंद्रकांत मोकाटे म्हणाले, गेली ९ वर्षे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या शिबिराला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे पण कोरोनाच्या या संकट काळात पुणे शहरात वारंवार रक्ताचा तुटवडा निर्माण होत असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
कोरोना महामारीच्या अवघड काळातदेखील मोठ्या संख्येने रक्तदान कार्यात सहभागी झाल्याबद्दल रक्तदात्यांचे ॲड.योगेश मोकाटे यांनी आभार मानले.तरुणाई मोठ्या संख्येने या रक्तदान उपक्रमात सहभागी झाली होती. उपक्रमास आधार ब्लड बॅंकचे सहकार्य लाभले.




