तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे: महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती रुग्ण तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर 106 (1) अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ससून रुग्णालयाच्या फेरचौकशी अहवालात त्यांच्या वैद्यकीय हलगर्जीपणाची स्पष्ट नोंद झाली असल्याची माहिती आहे, त्यावरून ही कारवाई झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला आहे. या अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 10 लाख रुपये डिपॉझिट करण्याचे मागणी करत ॲडमीट करून न घेतल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली होती. अनेक संघटना, राजकीय पक्षांकडून आंदोलन करत रुग्णालय प्रशासन व संबंधित डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली होती. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर समाजातील प्रतिष्ठान राग व्यक्त केला जात होता. सरकारने या घटनेची दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले होते.






