महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन..

प्रशासनाला खेळण्यातला ट्रक भेट…
पुणे : गंगाधाम मार्केट यार्ड चौक, बिबवेवाडी येथे एका भरधाव ट्रकच्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली आहे. या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या अपघातात जीवितहानी होत असतानाही प्रशासन कोणतीच भूमिका घेत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक खेळण्यातील ट्रॅक भेट देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
येथील घटनांसाठी महापालिकेचे रस्त्यावरील दुर्लक्षित नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेतील पोलीस प्रशासनाची निष्क्रियता जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केला आहे. नागरिकांचे प्राण हे राजकीय हस्तक्षेप, भ्रष्ट प्रशासन आणि निष्क्रिय यंत्रणेमुळे धोक्यात आले आहेत अशी टीकाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस – पुणे शहर यांच्या वतीने मुख्य अभियंता (पथ विभाग), पुणे महानगरपालिका अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे निवेदन देत तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनावेळी अमोल परदेशी यांनी अंगाला रक्त लावून, डोक्याला पट्ट्या बांधून, जणू अपघातग्रस्त व्यक्तीच्या रूपात स्वतःला सादर करून महापालिकेच्या संवेदनशून्यतेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात “खेळण्यातला ट्रक” मुख्य अभियंत्यांना भेट देऊन प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. हा ट्रक म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी चाललेल्या महापालिकेच्या “खेळा”चे प्रतीक होता.
यावेळी अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अमोल परदेशी,प्राजक्त जाधव,लखन वाघमारे,विद्या ताकवले,समीर पवार, अमोल ननावरे, प्राजक्ता जाधव , फारुख शेख, निलेश पवार, विद्या ताकवले, हर्षवर्धन दिघे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांनी केलेल्या प्रमुख मागण्या..
अपघातप्रवण रस्त्यांचे तातडीने पुनर्निर्माण,वाहनगती नियंत्रणासाठी यंत्रणा उभारणे, वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती, अपघात पीडित कुटुंबाला त्वरित मदत, महापालिकेच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई, जर प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्यातर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.



