कोथरूड : कोथरूड मधील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले. वेदभवन परिसरातील महामार्गाच्या कडेने असणारे दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्ते मोठे झाले पण या रस्त्यावर सुरक्षेच्या दष्टीकोनातून कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नसल्याने व चुकीचे फलक लावले गेले असल्याने स्थानिक नागरिकांना रोज जीव मुठीत धरून येजा करावे लागत आहे. याबाबत संबधित प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आज सोसायट्यांमधील असंख्य नागरिकांनी सर्व्हिस रस्त्यावर मुक मोर्चा काढत निदर्शने केली. यावेळी संतप्त भावना व्यक्त करणारे फलक हातात घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
वेदभवन परिसरातील महामार्गालगतचे दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्ते मोठे झाले. त्यावरून आता वेगाने वाहतूक सुरू आहे. याच रस्त्यावर दिशादर्शक, स्थलदर्शक फलक तसेच मार्गदर्शक चिन्हे चुकीची लावली गेली असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वेगाने होणारी वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना केल्या नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत संबधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत आपला संताप व्यक्त करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी काढलेल्या मुक मोर्चात
- ‘प्रशासनाचे लक्ष नाही अधिकाऱ्यांना वेळ नाही’
- ‘जायचं होतं पीएमटी डेपोत, पण वेदभवन कडून रस्ता नाही’
- ‘PMC आणि NHAI मध्ये नाही मेळ आणि आमच्या जीवाचा लावलाय खेळ’
- ‘PMC NHAI चे आडमुठे धोरण दिसत आहे रोजचे मरण’
- येतो म्हणतात येत नाहीत प्रश्न आमचा का सोडवत नाहीत’
- ‘वेद भवन रोड मौत का कुंवा PMC, NHAI की दुंवा’
- ‘वेद भवन परिसरात रस्त्याचे विणलं जाळ स्थानिकांच्या तोंडाला फासलं काळ’
अशा आशयाचे फलक घेऊन नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची तारांबळ झाली.
याबाबत निदर्शनात सहभागी असलेले राजा गोरडे म्हणाले, सर्व्हिस रस्ते तयार करत असताना स्थानिक सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक होते. महामार्ग प्राधिकरणाने अशा कोणत्याच उपाय योजना केल्या नसल्याने स्थानिक यातना सहन कराव्या लागत आहेत. आज नागरिकांचा रोष त्यांना पाहिला मिळाला आहे यानंतर तरी ते योग्य त्या उपाय योजना करतील अशी अपेक्षा आहे.