पुणे शहर, जिल्हा

गणेशोत्सवापूर्वी भोर-वरंधा, ताम्हिणी घाट मार्ग तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरू करा!

कोकण कृती समितीचे आमदार शंकर मांडेकर यांना निवेदन; बंद एसटी बससेवाही तातडीने सुरू करण्याची मागणी.

पुणे : गणेशोत्सवासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, यासाठी भोर-वरंधा व ताम्हिणी घाट मार्गांची तातडीने दुरुस्ती करून गणेशोत्सवापूर्वी हे मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत, तसेच सध्या बंद असलेल्या एसटी बससेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण कृती समिती, पुणे यांच्या वतीने करण्यात आली.

याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शंकर मांडेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कोकणातील रस्त्यांची सद्यस्थिती, चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि गणेशोत्सवाच्या काळातील संभाव्य वाहतूक कोंडी याबाबत आमदार मांडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Img 20260222 wa00063491038201882637992

दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सव व गौरी-गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. कोकणातील हा पारंपरिक आणि मोठ्या उत्साहाचा सण असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे या काळात कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते.

सध्या ताम्हिणी मार्ग बंद असून भोर-वरंधा घाट मार्गाचीही पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग लांब पल्ल्याचे, वेळखाऊ आणि खर्चिक आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी व भोर-वरंधा घाट मार्गांची पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली.

तसेच गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर २४ तास कर्मचारी, जेसीबी आणि आवश्यक आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली. दरड कोसळणे, रस्ता खचणे किंवा अन्य कारणांमुळे वाहतूक बंद झाल्यास तातडीने मार्ग मोकळा करता यावा, यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा सज्ज ठेवावी, असे समितीने स्पष्ट केले.

मढेघाट-महाड मार्गही खुला करण्याची मागणी
वेल्हे मार्गे मढेघाट ते महाड या रस्त्याचे काम जवळपास ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा मार्ग पर्यायी रस्ता म्हणून खुला करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

बंद एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
रस्त्यांसोबतच कोकणासाठी सध्या बंद असलेल्या एसटी बससेवाही गणेशोत्सवापूर्वी सुरू कराव्यात, अशी मागणी समितीने केली. पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणातील विविध भागात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा बससेवा उपलब्ध करून दिल्यास खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होण्यास मदत होईल, असे समितीने सांगितले.

आमदार शंकर मांडेकरांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
कोकण कृती समितीच्या निवेदनाची आमदार शंकर मांडेकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यांची आवश्यक कार्यवाही करून मार्ग सुरू करण्याबाबत तातडीने आदेश दिले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी एसटी बसचे आगाऊ आरक्षण सुरू करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी भोर-वरंधा व ताम्हिणी घाट मार्गांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कोकणासाठी एसटी बससेवेचे आगाऊ आरक्षण सुरू करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी केल्या.

यावेळी बाबा धुमाळ, तुकाराम जाधव, सचिन दिघे, मुकेश पोटे, प्रकाश यादव, अभिजित महाडिक, रामभाऊ बडंबे, सुनील मोरे, दशरथ माटवणकर, संभाजी गोगावले, राहुल शेलार, परेश अंगणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये