भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर परिसरातील पाणी प्रश्नात चंद्रकांत पाटील लक्ष घालणार.. अल्पना वरपे यांचे चंद्रकांत पाटील यांना पत्र

कोथरूड : भुसारी कॉलनी, बावधन, शास्त्रीनगर, वूइस रॉयल सोसायटी परिसरात (प्रभाग क्र १०) गेल्या ४-५ महिन्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. याबाबत माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्यावतीने सातत्याने पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु तेवाढयापुरती समस्या सुटत असली तरी पुन्हा परिस्थिती जैसे थी अशी होत आहे, त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी वरपे यांनी पत्राद्वारे त्यांच्याकडे केली आहे.
वरपे यांनी म्हंटले आहे की, प्रभागातील शास्त्रीनगर सारख्या परिसरांमध्ये नोकरदार वर्ग व कष्टकरी महिला राहतात. त्यांना सकाळी लवकर कामासाठी घरा बाहेर पडावे लागते. पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाबत आम्ही वारंवार प्रशासानाला तक्रार करून देखील त्यावर अद्याप ठोस नियोजन होताना दिसत नाही. या उलट दिवसेंदिवस या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बिकट होत चालली आहे.

या बाबत सखोल माहिती घेतली असता या भागाला पुरवठा होत असलेल्या चांदणी चौक टाकीची रोज येणाऱ्या पाण्याची लेवल पूर्वी पेक्षा 2 मीटरने कमी झाली आहे. त्याचा परिणाम प्रेशरवर व पाणी पुरवठ्यावर होत आहे. याच टाकीतून पाषाण भागाला जाणाऱ्या पाण्याची वेळ व पंपिंगची वेळ वाढविल्यामुळे सदर पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पाणी पुरवठ्याचे चुकीचे व्यवस्थापन व नियोजन तसेच अधिकाऱ्यांच्या दिरंगाईपणामुळे लाखो नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे, केवळ योग्य नियोजन नसल्यानेच ही कृत्रिम पाणी टंचाई उद्भवली आहे. असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे आपण चंद्रकांत दादा पाटील यांना या बाबत वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली असल्याचे वरपे यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी या विषयात लक्ष घातले असून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे, त्यामुळे या प्रश्नावर मार्ग निघेल असे वरपे यांनी सांगितले.






