येरवडा येथील गोल्फ क्लब चौकातील वाहतुकीत बदल

पुणे : येरवडा येथील गोल्फ क्लब चौकाच्या परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी खांबावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गोल्फ क्लब चौकातुन जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
दुचाकी व हलक्या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध
वाहतुक शाखेकडून उड्डाणपुलाच्या कामामुळे हलक्या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार आंबेडकर चौकातुन गोल्फ क्लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून जीएसटी भवन येथून वळसा घालून गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकाकडे जाईल. शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्लब चौकामार्गे आंबेडकर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून पुलाला वळसा घालून पुढे गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून आंबेडकर चौकाकडे जातील.
जड वाहतुकीसाठी
शास्त्रीनगर चौकाकडून आंबेडकर चौकाकडे जाणारी वाहतुक शास्त्रीनगर चौक सरळ गुंजन चौक,पर्णकुटी चौकातुन डावीकडे वळून महात्मा गांधी चौक तेथून आंबेडकर सेतुवरुन तारकेश्वर चौक , चंद्रमा चौक, पुढे आळंदी रस्त्याने इच्छित स्थळी जावे. आंबेडकर चौकातुन गोल्फ क्लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी वाहतुक आंबेडकर चौक, सादलबाबा चौक, डावीकडे वळून गुंजन चौक, तेथून शास्त्रीनगर चौकमार्गे पुढे जावे.