बंडखोर आमदारांविरोधात कोथरूडमध्ये शिवसेनेची उग्र निदर्शने ; फोटोंना मारले जोडे

पुणे : शिवसेना पक्षातून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन कोथरूडमध्ये आज करण्यात आले. यावेळी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
कोथरूड मधील महर्षी कर्वे पुतळा चौकात घेण्यात आलेल्या या आंदोलनात पुणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते, नगरसेवक, पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, उमेश भेलके, राजेश पळसकर, किशोर सोनार, भारत सुतार, नितीन शिंदे, नितीन पवार, छाया भोसले, शर्मिला शिंदे, सविता मते, भारती भोपळे व कोथरूड परिसरातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

ज्याला भगवा कळेल, त्याचे संकट टळेल
आवाज कुणाचा शिवसेनेचा,
चुकीला माफी नाही, मा. उद्धव साहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, सेना आमच्या साहेबांची नाही गद्दारांची असे फलक घेऊन शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी गद्दार आमदारांच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला तसेच गद्दार आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.






