कोथरूडमधील ‘या’ बांधकाम प्रकरणाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश ; मोजणीत गायब केलेला रस्ता पुन्हा आला नकाशावर ; बांधकाम प्लॅन मंजूर करतानाही घोळ

पुणे महापालिका आयुक्त काय कारवाई करणार ?
पुणे : पुणे शहरात कोथरूडमधील डी पी रस्त्यावरील गणेश कृपा सहकारी सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकल्पासाठी सोसायटीला लागून असलेला महापालिकेने निधी टाकून तयार केलेला सिमेंट काँक्रिटचा वहिवाटीचा रहदारीचा रस्ता बांधकाम प्लॅन मंजूर करताना मोजणी नकाशातून गायब होणे, प्रत्यक्षात १२ गुंठयाच्या जागेवर १५ गुंठ्याचा प्लॅन मंजूर करणे असे अनेक प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली सारवासारव आणि प्रत्यक्षात आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून आलेले चौकशीचे आदेश यामुळे आता पुढे काय होणार याची चर्चा रंगू लागली आहे.
गणेश कृपा सहकारी सोसायटीचा पुनर्विकास प्लॅन ज्यावेळी महापालिकेने मंजूर केला त्यावेळी सोसायटीच्या शेजारून गेलेला महापालिकेने निधी मंजूर केलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता मोजणी नकाशातून गायब करून ती जागा प्लॅनमध्ये दाखवण्यात आली. आपला रस्ता बंद होणार हे कळल्यानंतर श्री कॉलनीतील नागरिक जागे झाले. स्थानिक असलेले विशाल भेलके यांनी संबधित विभागाशी पाठपुरावा करून पत्रव्यवहार ही केला. ते जेव्हा अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा जवळपास त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला. पण भेलके यांनी पाठपुरावा केला, माहिती गोळा केली तेव्हा मात्र अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली.
बांधकाम प्लॅन मंजूर 15 गुंठ्यावर पण जागा 12 च गुंठे
महापालिकेनेच केलेला रस्ता पालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांना दिसला नाही का ? मोजणीत भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी रस्ता कसा गायब केला ? १२ गुंठ्याच्या जागेवर १५ गुंठ्याचा बांधकाम प्लॅन पुणे महापालिकेने कसा मंजूर केला असे प्रश्न जेव्हा उपस्थित झाले तेव्हा यात महापालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांनी व भूमिअभिलेखच्या मोजणी अधिकाऱ्यांनी हितसंबंध जोपासल्याची चर्चे बरोबर आरोप होऊ लागले. वरील उपस्थित झालेले प्रश्न पाहिले तर नक्कीच याबाबत कोणालाही शंका येणे साहजिकच आहे.
विशाल भेलके यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने अखेर येथील कामाला स्थगिती दिली. तर भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून गायब केलेला रस्ता पुन्हा मोजणी नकाशात दाखवला. हा काहीसा दिलासा भेलके यांच्या पाठपुराव्यामुळे येथील नागरिकांना मिळाला. मात्र भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे येथील हा रस्ता गायब केला हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
महापालिकेने चौकशी करण्याऐवजी स्थगिती उठवली.
या कामाला स्थगिती देण्यात आल्यानंतर याबाबत महापालिकेत नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासमोर दोन वेळा सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत विषय मिटवून टाका असा होरा अधिकाऱ्यांचा आपल्यावर होता या सुनावणीची तर तारीखच कळवण्यात आली नव्हती. बाहेरून समजल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा मला व्हॉट्स ॲपवर सुनावणीची नोटीस पाठवण्यात आली. आम्ही सुनावणीला येऊच नये असाच अधिकाऱ्यांचा डाव होता असे भेलके यांनी सांगितले. या सुनावणीत स्थगिती उठवत नवीन मोजणी नकाशा नुसार नवीन प्रस्ताव दाखल करण्यास संबधित बांधकाम व्यवसायिकास सांगण्यात आले. मात्र हा आदेश देत असताना असे म्हंटले आहे की, सुधारित मोजणीच्या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव सादर करून जागेवर काम चालू करणेस परवानगी देण्यात येत आहे. असे नमूद करण्यात आले आहे, मात्र प्रस्ताव दाखल करण्याच्या अगोदरच काम चालू करण्यास परवानगी देण्याचा हा नवीन प्रकार यामुळे समोर आला असून अधिकाऱ्यांना नवीन प्रस्ताव येण्या पूर्वी कामास परवानगी देण्याची एवढी घाई का झाली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सगळ्या विषयात भेलके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत दाद मागितली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्तांना या आदेशाचे पत्र पाठवण्यात आले असून याबाबत चौकशी करून काय कार्यवाही होणार हे पहावे लागणार आहे. या विषयात मोठा गैरप्रकार घडला असल्याने कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, उपअभियंता दत्तात्रय टकले यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भेलके यांनी केली आहे. तसेच या बांधकाम प्रकल्पाला माझा विरोध नाही मात्र नियमानुसार प्रत्यक्षात जागेवर असलेला श्री कॉलनीतील रस्ता सोडून बांधकामाचे साईड मार्जिन सोडून परवानगी देण्यात यावी जेणेकरून श्री कॉलनीतील लोकांचे आणि या पुनर्विकासात ज्यांना घरे मिळणार आहेत त्यांचे नुकसान होणार नाही. असे ही भेलके यांनी सांगितले.

याबाबत सिंहासन NEWS चे प्रतिनिधी यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांनी प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ केली.
क्रमशः











