“कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार – २०२१” राजवैभव शोभा रामचंद्र याना प्रदान….

पुणे : pune city कॉ. अशोक मनोहर मित्र परिवार समितीच्या वतीने दिवंगत जेष्ठ कामगार नेते व लाल निशाण पक्षाचे जनरल सेक्रेटरी कॉ. अशोक मनोहर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार हा संविधानाबाबत जनजागृती करणारे राजवैभव शोभा रामचंद्र यांना संविधान संवर्धन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्रमिक भवन कार्यालय एकलव्य सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. डॉ. अनंत फडके अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कॉ. उदय भट यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच कॉ. मेधा थत्ते यांनी पुरस्कार का? दिला जातो व स्वरूप काय? या बद्दल माहिती दिली.
अशोक मनोहर मित्र परिवार यांच्यावतीने सन २०१२ पासून ते आज पर्यंत राजू इनामदार, दादाराव पटेकर, दत्तात्रय अत्याळकर, कृष्णा चांदगुडे, पूनम कनोजिया कौशल अन्सारी, शर्मिष्ठा भोसले, डॉ. अभिजीत मोरे आणि राजवैभव शोभा रामचंद्र अशा एकूण नऊ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
राज वैभव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या “संविधान जागर” यात्रेच्या स्फूर्तीदायी अनुभवानंतर त्यांनी भारतीय संविधान बाबत संवादी पद्धतीने जनजागृती करण्याचे ध्येय ठरविले आहे . त्यांनी शालेय विद्यार्थ्यांपासून समाजातील विविध थरांमध्ये संविधान जागृती हा कार्यक्रम ओव्या व भारुडे इत्यादी कल्पक संवादी पद्धतीने तसेच संविधान संवादक संकल्पना संपूर्ण देशभर प्रचार व प्रसार व अंगीकार व विधायक हस्तक्षेप या सूत्रानुसार काम करण्यासाठी प्रत्येक खेडोपाडी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती संवाद करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. तसेच कार्यशाळा टीचर्स फॉर कॉन्स्टिट्यूशन हा शिक्षकांचा गट तयार करण्यामध्ये राज वैभव यशस्वी झाले आहेत. पाठ्यपुस्तकातील धड्यांमध्ये अंतर्भूत असलेली संविधान मूल्य, आपल्या जीवनाशी असलेला संबंध याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी व ती करण्यासाठीचे प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजीत करून संविधान जनजागृती करण्यासाठी युट्युबचा देखील त्यांनी वापर केला तसेच संविधान ग्रेट भेट या पुस्तिकेचे राज वैभव यांनी मित्रांच्या मदतीने प्रकाशन ही केले आहे.

लिंगभाव, संवेदनशीलता स्त्री संवेदनशीलता यावरही राज वैभव हे संवाद कार्यक्रम पुस्तिका यांच्यामार्फत जनजागृती करत आहेत. अशा या संविधान जागृतीच्या महान कार्याला स्वतः त्यांनी वाहून घेतले आहे. या देशातील संसदीय लोकशाही टिकली पाहिजे तसेच समता, स्वातंत्र्य बंधुत्व, सामाजिक, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जपून करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र जागरण करून भारतीय संविधानाची निर्मिती केली त्या संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्व भारतीय नागरिकांवर आहे. ती जबाबदारी आपण एकजुटीने व संघटीत राहून पार पाडली पाहिजे. शिवाय भारतीय संविधान मध्ये मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी हे संविधान टिकले पाहिजे, या संविधानमध्ये काय आहे हे जनतेला कळले पाहिजे, यासाठी आम्ही अहोरात्र संविधान जागृती मोहिम राबवत आहोत. ज्येष्ठ कामगार नेते “कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार” हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण संविधान जागृती करणाऱ्या संपूर्ण .कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असे मी मानतो व हा पुरस्कार माझा दोन मित्रांना समर्पित करतो असे गौरवोद्गार राजवैभव यांनी पुरस्कार स्विकारताना काढले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुरेश सावंत यांनी देशातील संविधान जागृती चे महान कार्य राजवैभव त्यांचे मित्रपरिवार करत आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे सन्मानपत्र पद्मजा माचिकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. संदीप मोरे व समारोप कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे यांनी केले.



