केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशवासीयांना पुन्हा एकदा चांगल्या रस्त्यांबाबत आश्वस्त केले आहे. देशात 2024 वर्ष अखेरपर्यंत अमेरिकेसारखे रस्त्यांचे जाळे दिसेल असे त्यांनी म्हटलं आहे. स्थानिकांना आधार कार्डाच्या आधारे पास देण्यात येतील आणि 60 किलोमीटरमध्ये एकच टोलनाका असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्थानिकांना होणाऱ्या टोलच्या त्रासाविषयी होणाऱ्या तक्रारी व सुचना आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीनगर ते मुंबई हे अंतर रस्तेमार्गे अवघ्या २० तासांत कापता येईल, असा दावाही यावेळी गडकरी यांनी केला. दिल्लीतून जवळच्या राज्यांतील अनेक शहरं केवळ दोन तासांत गाठता येतील. येत्या डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्णत्वास येतील. दिल्ली-अमृतसर अंतर 4 तासांत कापता येईल. दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासांत कापता येणार असून हे कामही येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे, असे गडकरी म्हणाले. दक्षिणेत चेन्नई-बेंगळुरू हा मार्ग होत असून नव्याने निर्माण होत असलेल्या रस्त्यांची ही यादी मोठी असल्याचे गडकरी म्हणाले.
जम्मू काश्मीरमध्ये 60 हजार कोटींची कामे सुरू आहेत. जोजिला टनेलचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. तिथे उणे तापमानात सुमारे एक हजार कामगार काम करत आहेत. 2026 च्या ऐवजी 2024 च्याआधी या टनेलचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. मनालीत अटल टनेल बनल्याने तीन तासांचं अंतर आता आठ मिनिटांत कापता येत आहे. लडाख लेहहून थेट कारगिल, कारगिल ते झेरमोर, झेरमोर ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू महामार्ग बनत आहे. यात एकूण पाच टनेलचे काम सध्या सुरू आहे, असे गडकरी म्हणाले.




