मनपा कर्मचाऱ्यांसाठी व्यसनमुक्ती आणि मन:स्वास्थ शिबिराचे आयोजन..
पुणे : सुखी आणि समाधानी व्हायचा असेल तर व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. व्यसने फक्त तात्पुरते सुख देत नाहीत तर त्यामुळे रोग, मृत्यु ,आत्महत्या, अपघात व गुन्हे होतात आणि गरीबी येते. पण व्यसन करणाऱ्याला वाटतं, हे सगळं इतरांना होणार आहे मला नाही. ह्या समजुतीतच मोठ्ठा धोका आहे. असे मार्गदर्शन महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा ,नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले. de-addiction and mental health camp for the employees of the pune municipal corporation
महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांच्या वतीने बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रभाग समिती अध्यक्षा राजश्री शिळीमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, समुपदेशक मंगेश कार्लेकर, अनिल गोरे, दत्ता श्रीखंडे, क्षेत्रिय अधिकारी गणेश सोनुने आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे सहकार्य लाभले.
“घरात व्यसनी व्यक्ती असेल तर कुटुंबात कितीही पैसा आला तरी तो अपुरा पडतो. मात्र व्यसन नसेल त्या कुटुंबाचा कमी कमाईत टुकीने संसार होतो.” याकडे या शिबिरात लक्ष वेधण्यात आले. “अध्यक्षपदाच्या काळात मी ज्या योजना आणल्या आहेत त्यांचा फायदा घेत कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करावी. अशा व्यसनमुक्त कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्याची संधी मला द्यावी.” असेही सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाल्या.
समुपदेशक मंगेश कार्लेकर यांनी मुक्तांगण संस्थेच्या गेल्या ३३ वर्षातील कार्याचा पट उलगडला. अनिल गोरे यांनी सिगारेटच्या व्यसनाचे त्यांना झालेले तोटे मोकळेपणाने सर्वांना सांगितले. गोरे यांनी सोप्या शब्दात व्यसनाची व्याख्या सांगितली. “स्वतःला व इतरांना फायदा होईल अशी सवय म्हणजे छंद आणि स्वतःला आणि इतरांना त्रास होईल अशी सवय म्हणजे व्यसन” तेव्हा छंद जोपासा आणि व्यसनांपासून दूर राहा असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अखेरीस दत्ता श्रीखंडे यांनी सांगितलेला त्यांचा जीवनप्रवास ऐकून श्रोते थक्क झाले.
व्यसनमुक्तीमुळे झालेली त्यांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक प्रगती एखाद्या सिनेमात शोभेल अशी होती. चौथी नापास विद्यार्थी आता पीएचडी करायची म्हणतो ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट श्रीखंडे यांनी अफाट मेहनतीच्या जोरावर साध्य केली आहे. त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती साऱ्यांना भावली.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर व कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल गणेश सोनुने यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केतकी घाटगे यांनी केले तर क्षेत्रिय अधिकारी गणेश सोनुने यांनी आभार मानले.