दीपक मानकर पुणे लोकसभेचे उमेदवार ? कसब्यातील विजयी फॉर्म्युला कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली….

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याने भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून यामध्ये कसबा पोट निवडणूकीची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून तिन्ही पक्षांमध्ये भाजप समोर ‘तगडा’ उमेदवार म्हणून राष्ट्रवादीतील दीपक मानकर यांच्या नावाची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून या पोट निवडणूकीत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, गौरव बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, मेधा कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला निवडणूक एकीने लढून विजयी होण्याचा कसबा पोट निवडणूकीचा विजयी फॉर्म्युला कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये सर्वमान्य असा तगडा उमेदवार देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. या रणनीतीचा महत्वाचा घटक म्हणून दीपक मानकर यांच्या नावा बाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे समजत आहे.
माजी उपमहापौर दीपक मानकर गेल्या 35 वर्षांपासून पुण्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. पुणे महापालिका शिक्षण मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, उपमहापौर अशा विविध पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. 2015 साली मानकर यांनी काँगेस मधून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. शहराच्या प्रत्येक भागात असलेला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तसेच पुण्यातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या सोबत मैत्रीचे संबंध या मानकर यांच्या जमेच्या बाजू आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँगेस पक्षाकडे आहे. कॉग्रेस कडून अरविंद शिंदे, मोहन जोशी, रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच दीपक मानकर यांचे नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत आल्याने मानकर यांना जर उमेदवारी देण्याचे निश्चित झाले तर ते कॉग्रेसच्या की राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.






