
पुणे : कोथरूड येथील बुट्टॆ पाटील कॉम्प्लेक्स ते कासट पेट्रोल पंपालागत सायकल ट्रॅक चे काम मनपा तर्फे करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी तेथे असलेल्या झाडांना मात्र कापण्यात येत असल्याचा आरोप कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी केला आहे.
या संदर्भात राजेश गुर्रम, सहाय्यक आयुक्त महापालिका, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदन दिल्याचे ही गुरूनानी यांनी सांगितले. सायकल मार्गाला विरोध नसून त्या मार्गामुळे होणाऱ्या झाडांच्या नुकसानीला विरोध असल्याचे गुरूनानी यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या झाडांचे नुकसान झाले आहे त्याच्या दुप्पट झाडे न लावल्याशिवाय कामाला पुढील परवानगी दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही त्यांनी दिला. फक्त झाडे लावूनच नाही तर त्यांना जगवून महानगरपालिकेने पर्यावरणाशी सलोखा ठेवावा असेही त्यांनी नमूद केले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली महानगरपालिका “झाडे लावा झाडे जगवा” च्या पूर्णपणे विरोधात जात असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी भाजपा वर हल्ला चढवला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक सचिव ऋषिकेश शिंदे, केदार कुलकर्णी आणि सरचिटणीस सुनील हरळे उपस्थित होते.







