पुणे शहर

मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला सूचना देणार : राज्यपाल

मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला सूचना देणार : राज्यपाल
पुणे – मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेऊन समाजाच्या विविध मागण्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. राज्यपालांनी ही  सकारात्मक प्रतिसाद देत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला सूचना देणारा असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
राज्यपालांसोबत झालेल्या या सकारात्मक भेटीमुळे मातंग समाजाच्या इतिहासात नवी पहाट घेऊन येईल, असा विश्वास शिष्टमंडळातील नेत्यांनी व्यक्त केला.
या सर्वपक्षीय राज्यस्तरीय शिष्टमंडळामध्ये माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहराध्यक्ष विजय उर्फ बापु डाकले, आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भांडे, काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे, युवक आय. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदिपान झोंबाडे,  लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, भालचंद्र सुगवेकर  तसेच अनेक प्राध्यापक, साहित्यिक आदींचा समावेश होता.
*लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम गतीने व्हावे, मातंग आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी तातडीने व्हावी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला तातडीने मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्या.*
राज्यात विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून गेल्या सहा दशकात मातंग समाजाच्या एकाही व्यक्तीला राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी मिळालेली नाही. हा अनुशेष दूर करून अण्णा भाऊ साठे  जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाला न्याय द्यावा, अशी विशेष मागणीही शिष्टमंडळाने केली. यावर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देत राज्यपालांनी मातंग समाजाच्या जास्तीत जास्त मागण्या मंजूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला निर्देश देऊ, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे. राज्यपालांसोबत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीमुळे मातंग समाजातला एक नवी ऊर्जा मिळाल्याची भावना शिष्टमंडळाच्या वतीने रमेश बागवे , विजय डाकले  यांनी व्यक्त केली.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये