रवींद्र धंगेकरांसाठी आता उद्धव ठाकरे मैदानात; पुण्यातील सभेचं ठिकाणं ठरलं!
पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये पुन्हा 11 मे रोजी नदीपात्रामध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे धंगेकर यांना बळ मिळणार आहे.
यापूर्वी पुण्यात नरेंद्र मोदी यांची सभा झाली असून राज ठाकरे यांचीही सभाही महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आली आहे. आता रवींद्र धंगेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याने त्यांना बळं मिळालं आहे. राज्यांमध्ये काँग्रेस उमेदवारांसाठी राहुल गांधी यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या सभा सर्वाधिक झाल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांसाठी उद्धव ठाकरे यांच्या सभा काँग्रेस उमेदवारासाठी अनुकूल ठरतील, असा अंदाज आहे.
उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत काँग्रेस उमेदवारांसाठी अमरावती, सोलापूर, धुळे, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. पुण्यासह जालनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी भंडारा, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघामध्ये काँग्रेस उमदेवारांसाठी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना हिंदुत्ववादी मते खेचली जातील, त्या दृष्टिकोनातून या सभा महत्त्वाच्या आहेत.