पुण्यात ५१.२५ टक्के मतदान..मतदार यादीतले नाव उडाल्याने मतदारांमध्ये संताप
पुणे : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज पुणे लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. कोथरूड मध्ये काही मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मतदारांची गर्दी झालेली पहायला मिळाली. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत पुण्यात पहायला मिळत आहे. पुणे लोकसभेत एकूण ५१.२५ टक्के मतदान झाले.
कोथरूडचे आमदार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील महेश विद्यालयात रांगेत उभा राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी एमआयटी शाळेतील केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले.
दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला मात्र दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी कमी झाली. मतदार यादीतून नाव उडाल्याने अनेक मतदारांना मतदान करता आले नाही, त्यामुळे त्यांच्याकडून निवडणूक आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. कोथरूड मधील पंडित दिनदयाळ शाळेतील केंद्रावर मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. काही मतदान केंद्रावर मतदानास गेलेल्या व्यक्तीच्या नावाने अगोदरच मतदान झाल्याचेही प्रकार घडले आहेत. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने आधीच मतदान झाल्याचा प्रकार पुढे आला. माझ्या नावाने आधीच मतदान कसे झाले असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
मुरलीधर मोहोळ प्रशासनावर संतापले.
कोथरूड मधील पौड रस्त्यावर एमआयटी शाळेत ४ पोलिंग बुथ असताना देखील मतदारांसाठी एकच रांग करण्यात आली होती. यामुळे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना ४ रांगा करायला सांगितल्या. प्रत्येक बुथसाठी स्वतंत्र रांग अपेक्षित असताना मतदान केंद्रावरचे अधिकारी एकाच रांगेतून मतदारांना आत सोडत होते. यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते.
पुण्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, ११ वाजेपर्यंत १६.१६ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २६.४८ टक्के, तीन वाजेपर्यंत ३५.६१ टक्के, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४.९० टक्के असे मतदान पार पडले.
पुणे ५ वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघ निहाय सायंकाळी
कसबा पेठ – ५१.७ %, कोथरूड – ४८.९१ %, पर्वती – ४६.८० %, पुणे कॅन्टोन्मेंट – ४४.०१ %, शिवाजीनगर – ३८.७३%, वडगाव शेरी – ४०.५०%
पुणे लोकसभा मतदारसंघ, अंतिम सरासरी आकडेवारी :
विधानसभा निहाय:
कसबा पेठ : 57.90%
कोथरूड : 49.10%
पर्वती : 52.43%
पुणे कॅन्टोन्मेंट : 50.52%
शिवाजीनगर : 49.72%
वडगाव शेरी : 49.71%