पुण्यातील नरेंद्र मोदींच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस मोठी ताकद लावणार – दीपक मानकर

नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक संपन्न
पुणे : पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चार लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होणाऱ्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून हजारो कार्यकर्त्यांसह भव्य रॅली व्दारे शक्तिप्रदर्शन करीत सभेला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली आहे.
पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चार लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी रेसकोर्स मैदान येथे होणार आहे.
या भव्य जाहीर सभेच्या तयारीसाठी तसेच नियोजनासाठी नारायण पेठ येथील गुप्ते मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी बैठक पार पडली.

मानकर म्हणाले, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. काल झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मी मोदींजीच्या सभेला हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानूसार नारायण पेठेत नदीपात्रालगत भिडे पुलापासून दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भव्य रॅली व्दारे रेसकोर्स मैदानावर पोहचणार आहे.
यावेळी मानकर यांनी या बैठकीमध्ये सभेच्या अनुषंगाने करत असलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






