आज कोथरूडमध्ये होणाऱ्या दलजीत दोसांझ कॉन्सर्टची परवानगी रद्द करा ; अन्यथा जन आंदोलन करून कार्यक्रम बंद पाडू भाजपचा पोलिसांना इशारा..
पुणे: कोथरूड येथील वनविभाग, रेड झोन व रहिवाशी भागाला लागून असणाऱ्या सूर्यकांत काकडे फार्म, आज २४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या दलजीत दोसांझ यांचा संगीत कॉन्सर्टमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कॉन्सर्टच्या ठिकाणी मद्यविक्री होणार असल्याची चर्चा असून अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्याने हा लाईव्ह संगीत कॉन्सर्टचा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन भाजपच्या वतीने पुणे शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे, नितीन शिंदे, चिटणीस अमोल डांगे, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, कोथरूड सरचिटणीस डॉ.अनुराधा ऐडके, गजानन माझिरे, सतीश दिघे, मंगेश मते, केदार बलकवडे यांच्याकडून परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सभांजी कदम यांना देण्यात आले आहे.
कोथरूड मधील सूर्यकांत काकडे फार्म वर आयोजित करण्यात आलेल्या सदर लाईव्ह कॉन्सर्ट या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मद्य विक्री केली जाणार असल्याचे दिसत असून तशी त्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आह . ही आपल्या पुण्याची संस्कृती नाही. याला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे विरोध आहे असे पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकरच्या मोठ मोठ्या भिंती रचल्या गेल्याचे लक्षात येत आहे. आवाजाची कुठलीही मर्यादा त्यामुळे पाळली जाणार नाही. सदर ठिकाणी रेड झोन, वनक्षेत्र व मोठ्या प्रमाणात रहिवासी आहेत. येथे येणाऱ्या तरुण तरुणींची संख्या लक्षात घेता व तेथील रस्ते व रहदारी लक्षात घेता एखादा मोठा अपघात किंवा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून नागरिक मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला विरोध दर्शवत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा व त्यांना होणारा त्रासाचा विचार करून या कार्यक्रमाला देण्यात आलेल्या परवानग्या रद्द करुन कार्यक्रमास स्थगिती द्यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र जन आंदोलन करून कार्यक्रम बंद पाडण्यात येईल असा इशारा भाजपच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
कोथरूड मधील सूर्यकांत काकडे फार्म होत असलेल्या संगीत लाईव्ह कॉन्सर्टमुळे रहिवासी भागात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल मंदार बलकवडे यांनी उपस्थित केला आहे. अशा कार्यक्रमांना परवानगी देताना तेथील परिसराचा अभ्यास करून रहिवाशांना त्याचा त्रास होईल का याचा अंदाज घेणे आवश्यक आहे, मात्र अशा कार्यक्रमांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा कसलाच विचार प्रशासन परवानगी देताना का करत नाही असा प्रश्न कोथरूडकर नागरिक उपस्थित करत आहेत.
वनक्षेत्रात असलेले पशुपक्षी तसेच रहिवाशी भागात असलेले नागरिक यांना या कार्यक्रमाचा त्रास होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येणाऱ्या युवा वर्गामध्ये मद्य विक्री ही होणार असल्याने अनुचित प्रकार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक नागरिकही या कार्यक्रमाला कडाडून विरोध करताना दिसत आहे. आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.