कोथरूडमध्ये दलजीत दोसांझ संगीत कॉन्सर्टच्या ठिकाणी होणाऱ्या मद्य विक्रीला अखेर बंदी ; भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर निर्णय..
सूर्यकांत काकडे फार्मवर होणार आहे कार्यक्रम..
पुणे: कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मवर आयोजित करण्यात आलेल्या दलजीत दोसांझ याच्या संगीत कॉन्सर्टच्या ठिकाणी होणाऱ्या मद्यविक्रीला भाजपच्या आंदोलनाच्या इशारानंतर बंदी घालण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कॉन्सर्टच्या ठिकाणी लावण्यात आलेले मद्याविक्रीचे स्टॉल काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मद्य विक्रीमुळे होणाऱ्या अनुचित प्रकाराला आळा बसणार आहे.
कोथरूड येथील वनविभाग, रेड झोन व रहिवाशी भागाला लागून असणाऱ्या सूर्यकांत काकडे फार्मवर आज २४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या दलजीत दोसांझ यांचा संगीत कॉन्सर्ट कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कॉन्सर्टच्या ठिकाणी मद्यविक्री होणार असल्याने अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता वर्तवली गेल्याने हा लाईव्ह संगीत कॉन्सर्टचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती.
या मागणीचे निवेदनही पुणे शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे, नितीन शिंदे, चिटणीस अमोल डांगे, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, कोथरूड सरचिटणीस डॉ.अनुराधा ऐडके, गजानन माझिरे, सतीश दिघे, मंगेश मते, केदार बलकवडे यांच्याकडून परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सभांजी कदम यांना देण्यात आले होते. कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा या निवेदनात पोलीस प्रशासनाला देण्यात आला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता व प्रशासनाला सूचना केल्या होत्या.
भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाने यंत्रणा हलवून कॉन्सर्टच्या ठिकाणी होणाऱ्या मद्यविक्रीला बंदी घातली आहे. भाजपचे मंदार बलकवडे यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रम ठिकाणी जाऊन पाहणी केली असता येथील मद्य विक्रीचे स्टॉल काढून घेतले जात असल्याचे आढळले आहे.
कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मवर आयोजित करण्यात आलेल्या दलजीत दोसांझ याच्या संगीत कॉन्सर्टची चर्चा कोथरूड मध्ये जोरात सुरू होती. कॉन्सर्टच्या ठिकाणी मद्य विक्री होणार असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने सर्वच स्तरातून याला विरोध दर्शवला जात होता. रहिवासी भागात अशा कार्यक्रमांना परवानगी देताना मद्य विक्रीला कशी परवानगी देण्यात आली असा सवालही कोथरूडकारांकडून उपस्थित केला जात होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेते वेळीच हालचाली केल्याने येथील मद्य विक्रीला बंदी घालण्यात आल्याने पुढील धोका टाळला असला तरी अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यास येथे कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.