पुण्यात रात्री घराबाहेर पडताय ? मग ही काळजी अवश्य घ्या…

पुणे : देशातील प्रमुख चार विषारी सापापैकी एक, अशी ओळख असलेल्या घोणस सापांचा सध्या विणीचा हंगाम सुरू असल्याने मानवी वस्तीत ते मोठ्या संख्येने पहायला मिळत आहेत. गेल्या आठवडाभरात शहरातील सर्पमित्रांनी शंभरहून अधिक घोणस ताब्यात घेतले असून अनेक जणांना घोणसने दंश केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ‘नागरिकांनी रात्री घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन वाइल्ड ऍनिल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीने केले आहे.
घोणस या सापाचे डोके जाड आणि त्रिकोणी आकाराचे असते. मोठे डोळे आणि अंगावर काळ्या रंगाचे मोठे ठिपके असतात. इतर विषारी जातीच्या सापांपेक्षा त्याचे विषदंत मोठे असतात. हा साप दाट जंगलात आढळत नाही. पण मनुष्यवस्तीत असलेल्या झुडूपांमध्ये आढळतो. घोणस या सापाचा विणीचा हंगाम नोव्हेंबर-डिसेंबर हा असतो. हा साप निशाचर असल्याने तो प्रामुख्याने रात्री बिळातून बाहेर पडतो. कित्येकदा एका मादीपाठोपाठ तीन ते पाचच्या संख्येने नर साप असतात. अनेकदा ते रस्त्यावर येतात. त्यांना छेडल्यास ते दंश करतात.

याची शरीररचना अजगर या सापाची मिळतीजुळती असल्याने अनेकजण जण याला अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात व दंश करुन घेतात. या सापाने दंश केलेल्या जागेवर तीव्र वेदना होऊन तोंडावाटे आणि नाकावाटे रक्त पडते. वेळीच उपचार केल्यास व्यक्ती दोन ते तीन दिवसात बरी होते. या आठवड्यात घोणसने पंधरा जणांना चावा घेतला असून संस्थेच्या सर्परक्षकांनी गेल्या १० दिवसात एकूण ६७ घोणस पकडून पुन्हा निसर्गात सोडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रात्री घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व २००२ नुसार “घोणस” हा साप अनुसूची २ मध्ये समाविष्ट आहे.



त्यानुसार यास मारणाऱ्या, पकडणाऱ्या व पाळणाऱ्या व्यक्तीस ३ ते ५ वर्ष कारावास व १०,००० रुपये दंड होऊ शकतो. तसेच याचे विष काढणे, कातडीची तस्करी करणे वा या सापाची विक्री करणाऱ्या व्यक्तीस ५ ते ७ वर्ष सक्तमजुरी व १५,००० रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. नुकतीच शिरुर येथे घोणस साप मारल्यामुळे तीन जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नागरीकांनी साप आढळल्यास वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या सर्परक्षकांशी संपर्क साधावा. वॅस्प्स या संस्थेचे सर्परक्षक गेली १२ वर्ष विनामूल्य साप व वन्यप्राणी वाचवण्याचे काम करत आहे. असे आवाहन वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसूळ






