कार्यकर्त्यांचा उत्साह बघून ऊर्जा मिळाली : राज्यसभेवर खासदार पदी निवड झाल्याने सुनेत्रा पवार यांचे पुण्यात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

पुणे : राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याने सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने जंगी स्वागत करत सत्कार करण्यात आला. गुलालाची, फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महिलांनी फुगडी खेळत आनंद साजरा केला.
नारायण पेठेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात सुनेत्रा पवार यांचा खासदार पदी निवड झाल्याने राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, आजचा कार्यकर्त्यांचा उत्साह बघून ऊर्जा मिळाली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कायम माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील इतर विधानसभा मतदार संघांचा बारामती सारखा विकास करण्याचे माझ ध्येय आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान सर्वत्र प्रतिसाद चांगला मिळाला. पण जनतेचा कौल मान्य करावा लागेल. पक्षातील लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. निवडणुकीत नक्की काय घडले यावर आमचं विचार मंथन सुरू आहे. पक्ष ठरवेल तशी वाटचाल केली जाईल असे मत सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दीपक मानकर म्हणाले, सुनेत्रा वहिनी यांनी आपल्या जीवनात अजित दादांना साथ देत सामाजिक बांधिलकी जपली. सुनेत्रा वहिनींना राज्यसभेची खासदारकी पदी संधी मिळावी यासाठी पहिला ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आला होता. आता त्यांची निवड झाल्याने त्यांचा पहिला सन्मान करण्याची संधी पुणे शहराला मिळाली याचा आनंद आहे. खासदार पदावर काम करत असताना त्या जनतेचे प्रश्न मार्गी लावतील याचा विश्वास असून त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं अशी आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा आहे.



याप्रसंगी सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, आरपीआय आठवले गटाचे मंदार जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्षप्रदीप देशमुख, खडकवासला विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, वडगाव शेरी विधानसभा सतीश म्हस्के, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अजय दराडे त्याचप्रमाणे दत्ताभाऊ सागरे, मुनीरभाइ सय्यद, शंतनू कुकडे, सदानंद शेट्टी, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, विजय डाकले गौरी जाधव तसेच शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

































