पुण्यात लॉकडाऊन नाही. पण कडक निर्बंध अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कड़क निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदी उपस्थित होते.पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
- पुण्यात हे आहेत कडक निर्बंध
- पुण्यातील शाळा – महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील.
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट
- हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरु राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल.
- त्याचबरोबर एकुण आसनक्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना परवनगी
- लग्न समारंभ , धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम , अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी
- नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाईपुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद
- रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार नियंत्रण
- एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येणार
- थिएटर, मॉल्स आणि दुकानं दहा वाजेपर्यंत सुरु राहतील.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते. या बैठकीदरम्यान पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला गेला. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.
विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे.



