राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे. आज सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे, आणि त्याच्या काही तास आधी जयंत पाटील यांना नोटीस मिळते, हा योगायोग समजायचा की आणखी काय,हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची नोटीस येणं हे काही नवीन राहिलेलं नाही. यापूर्वी जयंत पाटलांना ईडीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनाही त्रास देण्याचं काम भाजपनं सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. या चौकशीतून काहीही समोर येणार नाही. अशा नोटीसा अनेक नेत्यांना आलेल्या आहेत, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या. तसेच, अशा नोटीसा शरद पवारांपासून अनेक नेत्यांना अशा नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे या नोटीसांमुळे राष्ट्रवादी कमकुवत होण्याऐवजी आणखी भक्कम होत आहे, असंही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 2018 मध्ये याचप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी जयंत पाटील चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


