भाजप पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची निवड

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदी महापालिकेतील माजी नगरसेवक धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून घाटे यांची पुणे शहरात ओळख आहे.पुणे शहरामध्ये अनेक वर्षापासून घाटे भाजप संघटने मध्ये कार्यरत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात केली आहे.

बावनकुळे म्हणाले, मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.



भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे. असेही बावनकुळे म्हणाले.









