New Electric Bike लाँच करण्यास केंद्र सरकारची बंदी,आगीच्या घटना वाढल्यानं निर्णय

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत असतानाच केंद्र सरकराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात कोणतीही नवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.
इलेक्ट्रिक टू-व्हीलरला आग लागण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता, चूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध शासन गंभीर असून, या कंपन्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश काढण्यात येणार आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार अशा प्रकरणांमध्ये आवश्यक ते आदेश जारी करेल, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याआधी सांगितले होते.
गडकरींनी ट्विटद्वारे सांगितले होते की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींशी (With electric bikes) संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. गडकरी म्हणाले की, या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करून, शिफारस करण्यासाठी त्यांनी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. अहवालाच्या आधारे ते निष्काळजी कंपन्यांवर आवश्यक आदेश जारी करतील. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की ते लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील. कोणत्याही कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत निष्काळजीपणा (Negligence) दाखविल्यास त्याला मोठा दंड ठोठावला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत घेण्याचे आदेशही देण्यात येतील.







