वारजे भागात पोलीस चौकीजवळ गोळीबार

पुणे : नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच काही वेळातच गोळीबाराची घटना समोर आली आहे. वारजे येथील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार झाला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात मोठं दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
कार्तिक इंगवले असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे. कार्तिक इंगवलेचा मित्र वेताळ बाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी कार्तिकने त्या मित्राकडून 500 रूपये मागितले होते. त्याने पैसे नाही दिले म्हणून कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. गोळीबार करून आरोपीने तिथून पळ काढला. भर रस्त्यात गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी योगेश चंद्रकांत डोळसे यानी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सायंकाळी आपले काम करून फिर्यादी योगेश हा तरुण आपल्या दुचाकीवरून रामनगर मधील घराकडे जात असताना फिर्यादी यांच्या ओळखीचा असलेला या घटनेतील संशयीत आरोपी कार्तीक इंगवले हा त्याच्या मित्रासह दुचाकीवरून रामनगर च्या दिशेने जात होता. दरम्यान रामनगर येथील मारूती मंदिराजवळ आरोपी आणि फिर्यादी हे जवळपास आले असता संशयीत आरोपी कार्तीक इंगवले याने फिर्यादी तरूणास पाचशे रुपयांची मागणी केली, त्यावर फिर्यादी तरूणाने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगीतले असता पुन्हा चालत्या दुचाकीवरून पैसे मागण्यात आले. दरम्यान पैसे न दिल्याने आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून रामनगर येथील वेताळ बुवा चौक येथे वाहतूकीच्या रस्त्यावर आला असता मागे वळून फिर्यादी योगेश चंद्रकांत डोळसे याच्यावर गोळी झाडली. सुदैवाने गोळी चुकल्याने फिर्यादी थोडक्यात बचावले.



