उद्धव ठाकरेंची कॅसेट 10 वर्षांपासून तिथेच अडकलेली, महाविकास आघाडीचा मोर्चा ‘नॅनो’ : देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

मुंबई : महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमार्फत काढण्यात आलेल्या महामोर्चामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, हा महाविकास आघाडीचा ‘नॅनो’ मोर्चा होता, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी खोचक टोला लगावला. तसेच, उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे.

हा विराट मोर्चा असल्याचं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. मात्र, त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे. “मोर्चा तर नॅनो झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलवल्यानंतर परिस्थिती अशी हवी होती की कैक किलोमीटर लांब मोर्चा झाला. पूर्ण आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता. पण मोर्चा अपयशी ठरला हे संख्येवरून दिसतंय”, असं फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा पुनरुच्चार केला. यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं.”उद्धव ठाकरेंची कॅसेट गेल्या १० वर्षांपासून तिथेच अडकली आहे.मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाही. भारताचं संविधान सर्वोच्च आहे हे त्यांनाही माहिती आहे. तरीही तेच तेच डायलॉग ते किती दिवस मारणार आहेत?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
“आज तर त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाहीये. मुद्दाच नाहीये. फक्त शिवराळ भाषा वापरायची एवढ्यापुरता त्यांनी भाषण केलं आहे. मला वाटतं की त्यांनी आता काही नवीन लोक नेमून घेतले पाहिजेत की जे दोन चार नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील आणि ते भाषणात काहीतरी नवीन, ऐकण्यासारखं बोलतील. त्यांच्याकडून माझी एवढी एक माफक अपेक्षा आहे”, असंही फडणवीस उपहासाने म्हणाले.
महापुरुषांच्या बदनामीचा राजकीय मुद्दा महाविकास आघाडीकडून होत असल्याचं फडणवीस म्हणाले. “माझा शिवसेनेला सवाल आहे की ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसने केले, तेव्हा तुम्ही मोर्चा का नाही काढला? सावरकर मोठे नाहीत का? त्यामुळे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. आज हे तीन पक्ष विसरलेत की कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्न हा काही हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही. गेली ६० वर्षं तो सुरू आहे. या लोकांनी राज्य केलं, तेव्हा काहीही केलं नाही. आता कोणत्या तोंडाने ते हे सांगत आहेत? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील”, असंही फडणवीस म्हणाले.