राष्ट्रीय

अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा, तर 11 जणांना जन्मठेप

अहमदाबाद : अहमदाबादच्या विशेष कोर्टाने जुलै 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी 38 जणांना ( ahmedabad ) फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 11 जणांना जन्मठेप सुनावली गेली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने 49 आरोपींना दोषी ठरवले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

अहमदाबादच्या विविध भागांमध्ये 2008 ला बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्या कोर्टाने याबाबत आज निकाल दिला आहे. 26 जुलै 2008 ला अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरले होते. या प्रकरणी UAPA अंतर्गत 78 पैकी 49 आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. तपासात मदत केल्याबद्दल दोषींपैकी एक असलेल्या अयाज सय्यद याची निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय 29 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Img 20220217 wa0003

अहमदाबादच्या बॉम्बस्फोटांमध्ये 70 मिनिटांत 56 जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये 200 हून अधिक जण जखमी झाले होते. 13 वर्षांहून अधिक काळ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. विशेष कोर्टाने 8 फेब्रुवारी 2022 रोजी 49 जणांना दोषी ठरवले होते, तर 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये मदत द्यावी, असे कोर्टाने आदेश म्हटले आहे.

गुजरात पोलिसांनी 28 जुलै ते 31 जुलै 2008 दरम्यान शहराच्या विविध भागातून 29 बॉम्ब जप्त केले होते. त्यापैकी 17 बॉम्ब वराछा भागात आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटरमुळे या बॉम्बचा स्फोट होऊ शकला नसल्याचे तपासात समोर आले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 77 आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण झाली होती. खटला सुरू असलेल्या 78 आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. 2002 च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला होता.

अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. यानंतर उर्वरित दहशतवादी देशातील विविध शहरांतून पकडण्यात आले. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या याच टीमने जयपूर आणि वाराणसीमध्येही स्फोट घडवून आणले होते. देशातील अनेक राज्यांचे पोलीस त्यांना पकडण्यात गुंतले होते. पण ते एकामागून एक बॉम्बस्फोट करत गेले. अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जुलै 2008 ला सुरतमध्येही मालिका बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते स्फोट होऊ शकले नाहीत.

देशातील विविध शहरांमधून एकूण 78 जणांना अटक करण्यात आली होती. या स्फोटांत सहभागी असलेल्या अन्य 8 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टर माईंड यासीन भटकळ हा दिल्लीतील तुरुंगात तर अब्दुल सुभान उर्फ तौकीर हा कोचीन येथील तुरुंगात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये