‘आप’ चौकाचौकात लावणार राष्ट्रगीत

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या भोंगा आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa ) वादात आता आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) उडी घेतली आहे. सर्वच भोंग्यांचा निषेध करत सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत ‘आप’कडून चौकाचौकात वाजवले जाणार असल्याची माहिती आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडून त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपसह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘2016 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही एका धर्माबद्दल न बोलता सर्व धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाला 75 डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, मनसे बेरोजगार तरुण आणि नागरिकांच्या महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या मुळ मुद्दांवरून भटकवत बुद्धिभेदाचे काम करत आहे. ग्रामीण भागातील मंदिरात सकाळी आरतीसाठी भोंगे लावले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.




