एसएमएस,सोशल मीडियाचा वापर करून खंडित वीजपुरवठ्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना द्या -आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी
पुणे : ज्या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे, तेथील नागरिकांना एसएमएस द्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे पूर्वसूचना द्यावी. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे आज (सोमवारी) केली आहे.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी, रामोशीवाडी, नीलज्योती सोसायटी, वैदूवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, भोसलेनगर, अशोकनगर, जवाहरनगर, वडारवाडी, पांडवनगर, हेल्थ कॅंप, सेनापती बापट मार्ग या परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, अशा तक्रारी नागरिकांनी आमदार शिरोळे यांच्याकडे केल्या. या तक्रारींच्या अनुषंगाने शिवाजीनगर महावितरणचे कार्यकारी अभियंता राठोड यांचेबरोबर आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली. नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना अधिकाऱ्यांना सांगितल्या आणि खंडित वीजपुरवठ्याबाबत सोशल मीडिया तसेच एसएमएस चा वापर करा, असे सूचविले.