महाराष्ट्र

भारतीय संविधान गौरव – देवेंद्रजींच्या भाषणाची पुस्तिका ;  राज्यभरातून उत्तम प्रतिसाद – मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. त्याप्रीत्यर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात संविधानासंबंधी सुमारे दीड तासांचे भाषण केले. त्याला त्यावेळी उत्स्फूर्तपणे, अगदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाची छापील प्रत मिळावी अशीही मागणी काही आमदारांनी केली होती. त्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन त्या भाषणासहित संविधानासंबंधीची रंगीत संदर्भ पुस्तिकाच प्रकाशित केली.

26 नोव्हेंबर रोजी झालेल्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, विद्यापीठांचे कुलगुरु आणि अभ्यासकांना ही पुस्तिका वितरित केली, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Img 20251125 wa00126624322614302660332

देवेंद्रजींनी आपल्या भाषणात संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अमूल्य योगदान, त्यातील तरतुदी, दुरुस्त्या, संविधानाची वैशिष्ट्ये, आणीबाणीचा काळा कालखंड आणि देशाच्या विकासासाठी असलेली संविधानाची उपयुक्तता अशा विविध मुद्द्यांसंबंधी अत्यंत ओघवत्या भाषेत, प्रभावीपणे, उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. दूरचित्रवाहिन्यांवरूनही कित्येक नागरिकांनीही हे भाषण ऐकले. विरोधी पक्ष सदस्य आमदार भास्कर जाधव यांनी या भाषणाबद्दल देवेंद्रजींचे कौतुक तर केलेच पण लिखित स्वरुपात हे भाषण सर्वांना उपलब्ध व्हावे असे सुचवले होते.

संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगेचच त्यावर कार्यवाही सुरू केली. सुमारे 32 पानांच्या या पुस्तिकेत मूळ राज्य घटनेतील नंदलाल बोस यांनी चितारलेली गौतम बुध्द, रामायण, महाभारत आदि महाग्रंथांमधील प्रसंगचित्रे, छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रेखाचित्रे यांचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या, संत बसवेश्वरांनी प्रस्थापित केलेल्या लोकशाही प्रारुपापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानावर आधारित राज्यघटनेच्या मसुद्याची रचना केली, त्या सगळ्याचे सविस्तर संदर्भ, बाबासाहेबांची संविधान सभेतील छायाचित्रे यामुळे ही पुस्तिका संविधानाचे अभ्यासक, लोकप्रतिनिधी, स्पर्धा परीक्षेचे आणि अन्य विविध स्तरातील विद्यार्थी, ग्रंथालये या सर्वांनाच उपयुक्त ठरली असल्याचे या पुस्तिकेला मिळत असलेल्या प्रतिसादावरुन दिसते, असेही पाटील म्हणाले.

स्वतः मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तिकेला प्रस्तावना लिहिली असून विविध माध्यमातून देवेंद्रजींचे हे संविधानाविषयीचे भाषण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Screenshot 20251127 133505 chrome819318172408390927

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये