पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पुढील आठवड्यात जाहीर होणार…

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या कामाला निवडणूक आयोगाने ६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आराखडा बनविण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे या आज पर्यंत (३० नोव्हेंबर) कच्चा आराखडा पूर्ण करून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती.
राज्य निवडणूक आयोगाने ६ डिसेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास मुदत वाढवून दिल्याने येत्या पाच- सहा दिवसांमध्ये पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग रचना कधी जाहीर होणार या विचाराने इच्छुक उमेदवार चिंतेत पडले होते. मात्र आता लवकरच प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने इच्छूक उमेदवारांना निवडणुकीची तयारी सुरू करता येणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. कोरोनामुळे जनगणना होऊ शकलेली नाही, त्यामुळे या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या १० वर्षात लोकसंख्या वाढल्याने कायद्यात बदल करून महापालिकांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १६१ वरून १७३ इतकी निश्चीत करण्यात आली आहे. ही नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने प्रभागांचा आकार कमी होऊन प्रभागांची संख्या ४२ वरून ५५ इतकी होणार आहे.



