शिंदेंसोबत गेलेले किती आमदार निवडून येतील, भुजबळांनी सांगितला आकडा

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदेसोबत गेलेल्या ४० आमदारांचं पुढे काय होणार, त्यातले किती जण निवडून येणार, असा प्रश्न महाराष्ट्रात नेहमी विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत देण्याचा प्रयत्न केला आहे.

भुजबळांना त्यांच्या आणि शिंदेंच्या बंडाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शिंदेसोबत गेलेले किती आमदार निवडून येतील, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर शिवसेना ही शिवसैनिकांच्या रक्तात भिनलेली असते. नेता जरी गेला तरी कार्यकर्ते पक्षासोबत राहतात. माझगावमध्ये आम्ही पक्षाचं काम मजबुतीनं केलं. त्यामुळे मी पक्ष सोडला तरीही शिवसैनिक हलले नाहीत. त्यामुळे मी पराभूत झालो, असं भुजबळांनी स्वतःचे उदाहरण देतच सांगितलं.



…आणि भुजबळांनी सांगितले किती जण निवडून येतील
उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत. त्यांनी दिलेला राजीनामा, त्यांना सोडावा लागलेला बंगला, यातून त्यांना सहानुभूती मिळाली. सभेतून ती पाहायला मिळते. या सर्व पार्श्वभूमीवर ४० जणांमधील किती जण निवडून येतील ते सांगणं महाकठीण आहे. आता मी एखादा आकडा सांगितला तर ते माझ्या अंगावर येणार. पण माझी कल्पना अशी आहे की ते दोन आकडी संख्यादेखील गाठू शकणार नाहीत. दहा जण निवडून आले तरी खूप झाले, असं भुजबळ म्हणाले.



