कोथरूडमधील भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर व बावधान परिसरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय..

आयुक्त, आमदार, लोकप्रिनिधींनींचा पाहणी दौरा व बैठक
कोथरूड : कोथरूड मधील चांदणी चौक पाण्याची टाकीवरून भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, एकलव्य कॉलेज परिसर व बावधान परिसरात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई सोडवण्यासाठी आज महापालिका आयुक्त, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
आज चांदणी चौक पाण्याच्या टाकीजवळ खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत पाहणी दौरा व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरील भागातील गेल्या ८-१० महिन्या पासून सुरू असणारी पाणी समस्या सोडवण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, भाजपा खडकवासला मतदार संघ पश्चिमचे अध्यक्ष ॲड गणेश जयवंत वरपे, माजी नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे, प्रभाग अध्यक्ष सुरेंद्र कंधारे, वैभव मुरकुटे, धनंजय दगडे पाटील, कैलास मोहोळ, राजेश मनगिरे, प्रणव उभे, नागरिक व पुणे मनपाचे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.



यावेळी वारजे पंपिंग स्टेशनं वरून कमी पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वारजे येथून येणारे पंपिंग वाढवून चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीत तात्काळ २० दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याच्या सूचना आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना यावेळी दिल्या. तसेच स्वामी विवेकानंद नगर (डुक्कर खिंड) परिसरात नवीन लाईन टाकण्याचे काम लवकर सुरू करावे व सध्या या ठिकाणी बुस्टर लावून पाणी प्रश्न निकालात काढावा असे देखील ठरले. भविष्यकाळातील गरज लक्षात घेता या भागात लवकरच पाण्याची नवीन टाकी बांधण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.



आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन झाल्यास प्रभागातील पाण्याचा प्रश्न निश्चितीच मार्गी लागेल व नागरिकाना पुरेश्या दाबाने व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी व्यक्त केली.





