कोरोनाबाधित विद्यार्थ्यांबाबत एमआयटीकडून महत्वाचे स्पष्टीकरण ; विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात खळबळ..

पुणे : “ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील मॅकॅनिकल इंजिनियरिंगच्या तिसर्या वर्षातील १३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आता कोरोनाचा प्रसार वाढणार असे बोलले जात आहे. त्यावर आता एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कोरोनाबाधित विद्यार्थ्यांबाबत महत्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कोरोना बाधित आलेल्या विद्यार्थ्यांनी लसीच्या दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्या संदर्भातील प्रमाणपत्र ही विद्यापीठाच्या प्रशासनाकडे उपलब्ध आहे. तसेच आम्ही वर्गात त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देतो ज्यांच्याकडे दोन्ही डोसचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे.” अशी माहिती युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा.डॉ. प्रशांत दवे यांनी दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाने दिलेले निर्देशानुसार शैक्षणिक संस्थाकडून कोरोना प्रतिबंधंक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयामध्ये ऑफलाईन वर्गासाठी प्रवेश दिला जात आहे. एमआयटीमधील सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच प्रवेश देण्यात येतो.

ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सर्व विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करीत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉप मध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता. ते वर्कशॉपच्या एका कोपर्यात तयारी करीत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा इतरांशी संपर्क आलेला नाही. तसेच, कोरोनाबाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात २५ विद्यार्थी आले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील १३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेली आहे. सद्यास्थितीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही. यातील काही विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अद्याप एकही विद्यार्थी ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळून आलेले नाही असे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कडून सांगण्यात आले आहे.



