कर्वेनगरमध्ये पालिकेच्या उद्यानाबाहेर रोज पडतोय कचऱ्याचा ढीग ; सोसायट्यांनाही होतोय त्रास.. कधी येणार प्रशासनाला जाग
लक्ष्मी नारायण पार्क सोसायटीकडून महापालिका सहाय्यक आयुक्तांना पत्र ; दिला आंदोलनाचा इशारा
कर्वेनगर : रोज सकाळी निरोगी आरोग्य लाभावे म्हणून उद्यानात नागरिक शुद्ध हवा घेण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी येत असतात. परंतु कर्वेनगर मधील महापालिकेच्या भालेकर उद्यानात येणाऱ्या नागरिकांना वेगळाच अनुभव घ्यावा लागत आहे. उद्यानाच्या बाहेर पडणारा कचऱ्याचा ढीग स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला असून वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांमध्ये संताप वाढू लागला आहे.
कर्वेनगर मध्ये असणाऱ्या भालेकर उद्यानाजवळ लक्ष्मी नारायण पार्क सोसायटीच्या कॉर्नरला मोठ्या प्रमाणावर कचरा पडत असून हा कचरा सोसायटीच्या गेट पर्यंत येत आहे. जवळच गोल्डन पेटल, चिंतामणी रेसिडेन्सी अशा मोठ्या सोसायट्या असून त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पद पथावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पालिका प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने लक्ष्मी नारायण पार्क सोसायटीच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नाईकल यांना निवेदन देण्यात आले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष संतोष शेट्टी, सचिव प्रतिक नलावडे, खजिनदार विजय बेंद्रे, सभासद दीपक निकटे यावेळी उपस्थित होते.
देण्यात आलेल्या निवेदनात खरंच महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कर्वेनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पडत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर पडत असलेल्या या कचऱ्याच्या ढीगांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कर्वेनगरमधील महापलिकेच्या भालेकर उद्यानाच्या भिंतीला लागून पदपथावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडत आहे. रोज सकाळी या उद्यानात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले येत असतात. त्यांना या पडणाऱ्या कचऱ्याचा व त्यामुळे निर्माण होत असलेल्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱ्यामुळे लक्ष्मी नारायण पार्क मधील नागरिकही हैराण झाले आहेत. नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने यावर उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांना घेऊन या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या संदर्भात महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नाईकल यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.