कर्वेनगर, वारजे परिसरात रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
कर्वेनगर : कर्वेनगर वारजे भागातील आकाशनगर, श्रीराम सोसायटी, पश्चिमरंग सोसायटी, समर्थ सोसायटी, कर्वेनगर मुख्य चौक, हिंगणे होम कॉलनी या परिसरात रस्त्याने वाहत असलेल्या ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्याने वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमोद शिंदे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नाईकल यांना शिंदे यांच्या वतीने देण्यात आले आहे.
सध्या कर्वेनगर ,वारजे भागातील आकाशनगर, श्रीराम सोसायटी, पश्चिमरंग सोसायटी, समर्थ सोसायटी, कर्वेनगर मुख्य चौक, हिंगणे होम कॉलनी या ठिकाणी रस्त्यावरील वाहणाऱ्या ड्रेनेच्या सांडपाण्यातूनच चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यामुळे त्वचा रोगासह इतर आजारांचाही धोका वाढला आहे. पुण्यासारख्या स्मार्ट सिटीतील एका भागात नागरिकांना सांडपाण्यातून चालावे लागत असणे ही खेदाची बाब असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे .
कर्वेनगर चौकात तर वाहणाऱ्या सांडपाण्याजवळ उभा राहून प्रवाशांना बसची वाट पहावी लागत असून हे चित्र भयानक आहे. डेंगी, मलेरिया व अनेक साथीचे रोग पसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच या रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे तातडीने यावर उपयोजना करण्यात यावी अशी मागणी प्रमोद शिंदे यांनी केली आहे.