कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना टक्कर देऊन बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गट मैदानात तर मनसेची स्वतंत्र तयारी, दोन्ही राष्ट्रवादीच्या इच्छुकांचीही मोर्चेबांधणी
विनायक बेदरकर
Pune पुणे : गेल्या पाच वर्षांत राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम कोथरुड( Kothrud )विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळत आहे. भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे(Chandrakant mokate)आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार (pruthviraj sutar)जोरदार तयारी करत आहेत. तर मनसेचे किशोर शिंदे(kishor shinde)हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच भाजपचे अमोल बालवडकर (amol balwadkar)हा युवा चेहरा भाजपच्या तिकिटाच्या संधीच्या अपेक्षेने जोरदार तयारी करत आहे. यामुळे कोथरूड विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोथरूड मतदारसंघात 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप आपले वर्चस्व कायम राखणार की शिवसेना ठाकरे गट बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोथरूड मतदारसंघातून 76 हजार मतांचे मताधिक्य केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांना मिळाले होते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र गेल्या 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोथरूड भागातून भाजपाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना 1 लाख 5 हजार एवढे मोठे मताधिक्य मिळाले होते. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत केवळ 25 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. लोकसभा निवडणुक राष्ट्रीय पातळीवर आणि विधानसभा, महापालिका निवडणूक स्थानिक पातळीवर व वेगळ्या मुद्द्यांवर होते. याची कल्पना भाजप नेतृत्वाला असल्याने पाटील यांनी मताधिक्य वाढविण्यासाठी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 2019 पासून कोथरूड मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने पाटील यांना कडवी लढत दिली होती. तर शिवसेना भाजप सोबत असल्याने पाटील यांना फायदा झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहेत.तर भाजप सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मनसे स्वतंत्र पणे मैदानात उतरत आहे.
भारतीय जनता पक्षाकडून मंत्री आणि भाजपाचे नेते असलेले चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येईल असे मानले जात आहे. मात्र भाजपाचे बाणेर बालेवाडी भागातील नगरसेवक अमोल बालवडकर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत निवडणुकीत युवा चेहऱ्याला पक्ष संधी देईल या अपेक्षेने जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद कोथरूड मध्ये देखील उमटले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांच्या पक्षाची कोथरूड भागात मोठी ताकद आहे.याचा मोठा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत होणार आहे. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोथरूडमध्ये शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी,कार्यकर्ते उध्दव ठाकरेंसोबत ठाम पणे उभे राहिल्याने भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा कोथरूडमध्ये तरी फारसा फायदा होण्याची शक्यता दिसत नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र व माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी बालेकिल्ला कोथरूड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या दोघांपैकी एकाला विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाला काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ मिळणार आहे.
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किशोर शिंदे विधानसभेची तयारी करत आहेत. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांना कडवी लढत दिली होती. त्यावेळी मोकाटे यांचा विजय झाला होता. त्यानंतर 2014 सालीच्या निवडणुकीत किशोर शिंदे फारसा प्रभाव पाडू शकले नव्हते. मात्र पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना कडवी झुंज देत भाजपचे मताधिक्य 25 हजार मतांवर आणून ठेवले होते.
महाविकास आघाडीमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याची दाट शक्यता असली तरी कोथरूड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे घ्यावा अशी मागणी करीत मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने (swapnil dhudhane)यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत दुधाने यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून आघाडीवर होते मात्र त्यावेळी पक्षाकडून मनसेला पाठिंबा देण्यात आला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय डाकले(vijay dakle)देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. डाकले यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक शासकीय समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ते आता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी आहेत. कोथरूड मधील तळागाळातील लोकांपर्यंत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र महायुती मध्ये ही जागा भाजप कडेच राहणार असल्याने डाकले काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.