पुणे शहर

स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा सुरु करावी : दिपाली धुमाळ

पुणे : वेळेवर योग्य उपचार व सुविधा मिळत नसल्याने  कोरोना रुग्ण दगावत आहेत. काल पुण्यात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीसाठी काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं वेळेत कार्डिॲक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने निधन झाले. ही अत्यंत दुदैवी व दु:खद घटना असुन पुणे महानगरपालिकेसाठी लाजीरवाणी बाब आहे. कोरोना रुग्णांवर योग्य व वेळेवर आवश्यक उपचार व सोयीसुविधा मिळणे महत्वाचे  आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेने स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा (कक्ष) उभारावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, पुणे शहरामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर व सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध असुन या सर्वांचे समन्वय होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. अशा प्रकारे पत्रकारावर वेळ येत असेल तर सामान्य  नागरिक कोणत्या संकटातुन जात असेल याची कल्पना ही करणे अशक्य आहे. कालच्या घटनेवरून तरी पालिकेने काहीतरी बोध घेणे आवश्यक आहे.

स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा सुरू केल्यास त्यातून नागरिकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा व औषध उपचार उपलब्ध करुन देता येतील व त्याचे रोजच्या रोज अपडेट संबंधीत रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतील अशी व्यवस्था करण्यात यावी.  रुग्णांना आवश्यकता भासल्यास  आय.सी.यु. ,व्हेटिंलेटर  व इतर सुविधा त्वरीत मिळण्यास मदत होईल. एखाद्या रुग्णास अन्य रुग्णालयात दाखल करावयाचे असल्यास लवकरात लवकर सर्व सुविधांयुक्त ॲमब्युलन्स उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे व ते या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातुन नियंत्रित करावे. टी व्ही ९ वृत्तवाहिनीचे पांडुरंग रायकर यांच्या प्रमाणे सामान्य रुग्णांवर वेळ येवु नये. यासाठी पुणे महानगरपालिकेने त्वरीत अत्यावस्थ रुग्णांवर वेळेत उपचार व आवश्यक सोयी सुविधा देणारी स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा (कक्ष) सुरु करावी.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये