Motor insurance : मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार

पुणे : केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2022 पासून तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
या प्रस्तावासाठी 14 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. नव्या प्रस्तावानुसार 1000 सीसी खासगी कार असलेल्या गाडीचा थर्डी पार्टी इन्शुरन्स नव्या प्रस्तावानुसार 2,094 रुपये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये हा इन्शुरन्स 2072 रुपये होता. खासगी कार 1000 सीसी ते 1500 सीसी दरम्यान असेल तर नव्या प्रस्तावानुसार इन्शुरन्स 3416 रुपये असेल. आता इन्शुरन्स 3,221 रुपये आहे. तर 1500 सीसी पेक्षा जास्त असलेल्या कारचा इन्शुरन्स 7,897 रुपये होईल. सध्या 7890 रुपये इतका आहे.

दुचाकी 150 सीसी ते 350 सीसी दरम्यान असतील, तर थर्ड पार्टी इन्शुरन्स 1,366 रुपयांपासून सुरु होईल. तर दुचाकी 350 सीसीच्या वर असेल तर कार इन्शुरन्स 2,804 रुपये असेल. करोना महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर सुधारित थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होईल असं सांगण्यात येत आहे.



विमा नियामकाशी सल्लामसलत करून रस्ते वाहतूक मंत्रालय थर्ड पार्टी दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी थर्ड पार्टी दर विमा नियामक आयआरडीएआयद्वारे अधिसूचित केले जात होते. दुसरीकडे, खासगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर गाड्यांसाठी इन्शुरन्सवर 15 टक्के सूट दिली जाणार आहे. हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार 7.5 टक्के सूट देण्याची तयारी करत आहे.
थर्ड पार्टी इन्शुरन्स का महत्त्वाचा ?
मोटार वाहन कायद्यांतर्गत थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. या विम्याअंतर्गत थर्ड पार्टीला दायित्व कवच मिळते. परिणामी, जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ता अपघात होतो, तेव्हा त्यात इतर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. याचा संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलते. म्हणजेच थर्ड पार्टी इन्शुरन्सचा थेट फायदा कोणत्याही अपघातात नुकसान झालेल्या तिसऱ्या व्यक्तीला मिळतो. म्हणूनच याला थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणतात. कार, बाईक किंवा इतर वाहनाचा अपघात झाला आणि त्यात कोणाचे शारीरिक किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर वाहन मालकाला त्याच्या नुकसानीची भरपाई करावी लागते. विमा कंपनी त्याच्या पेमेंटसाठी देखील जबाबदार आहे. अनेक प्रकारच्या भरपाईचा यात समावेश आहे.