उद्यापासून रंगणार कोथरुड सांस्कृतिक महोत्सव ; राहुल देशपांडे, सलील कुलकर्णी, संदीप खरे यांच्या दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी

शंकर केमसे यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ..
कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या वतीने कोथरुड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय महोत्सवामध्ये कोथरुडकर रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.
भुसारी कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून उद्या १० डिसेंबर रोजी कवी संदीप खरे व संगीतकार सलील कुलकर्णी यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम होणार असून ११ डिसेंबर रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा सूरमयी मैफिल हा शास्त्रीय गायन, संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता हे कार्यक्रम सुरू होणार आहेत. १२ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे.
याबाबत शंकर केमसे यांनी सांगितले की, कोरोना संकटामुळे गेली काही महिने नागरिक तणावाखाली होते. त्यांचा हा तणाव दूर करून नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचा हा माझा प्रयत्न आहे, आणि म्हणून या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.




