लक्ष्मणराव आपटे प्रशालेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंदात साजरा..

पुणे : आपटे रस्त्यावरील लक्षणराव आपटे प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षास आनंदात व उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी प्रणिता कुमावत , पुणे जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक संघांचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प , शैक्षणिक साहित्य, पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रणिता कुमावत यांनी जी ट्वेंटी अंतर्गत शैक्षणिक माहिती देताना पायाभूत साक्षरता व मूलभूत ज्ञान प्रत्येक मुलाला प्राप्त करण्यासाठी व त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी करावे लागणारे मेहनत याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. जी ट्वेंटी अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांची जबाबदारी उत्कृष्टरित्या प्रशालेच्या प्राचार्या सौ. मेधा सिन्नरकर यांनी पार पाडल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी मुलांनी जीवनातील ध्येय निश्चित करण्यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. तसेच नवीन पाठ्य पुस्तकाच्या नवीन रचना कशी आहे ? हे सांगून त्याचा योग्य वापर कसा करावा ? या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रशालेच्या प्राचार्या मेधा सिन्नरकर यांनी G 20 या अंतर्गत पावसाळी सहल , जादुचे प्रयोग , गाण्यांचा संगितमय कार्यक्रम , कागदकाम – ओरिगामी कोरिगामी , शालेय विद्यार्थ्यांसाठी एकांकिका या शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन प्रशालेने केले आहे. तसेच या कार्यक्रमात प्रशालेचा विद्यार्थी पार्थ कोकीळ याने गणितीय पाढे हे गीत सादर केले. प्रशालेतील शिक्षिका शुभदा सिद्धेश्वर यांनी पाढे व त्याचे विश्लेषण व्हिडिओद्वारे सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विशेष म्हणजे लक्ष्मणराव प्रशालेच्या एकात्म शिक्षण या मूकबधिर व कर्णबधिर या विभागाला भेट देऊन विद्यार्थ्यांना विशेष उद्बोधन केले. विद्यार्थ्यांशी हितगुज करून संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी ते शिकत असलेले शिक्षणाचे महत्त्व विशद करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत केला. जीवनातील जीवन कौशल्य या मुलांमध्ये रुजविण्याचे काम येथील शिक्षक करत आहे. विद्यार्थ्यांशी संगणकीय व कलात्मक साहित्य व दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू तयार केलेल्या वस्तूंचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुकही प्रमुख पाहुण्यांनी केले .
या प्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या मेधा सिन्नरकर , पर्यवेक्षक गौतम मगरे , जेष्ठ शिक्षक अजित गायकवाड , संतोष वाटाडे, गणेश पंडित , अमोल हरभरे, कविता शिंदे, हर्षा पिसाळ , मानसी गोणेकर , सुमेधा जोशी , हर्षदा हरिदास , कर्ण बधिर व्यवसाय विभागाचे मुख्याध्यापक आर्विकर , आश्विनी जोशी , स्वाती मॅडम , कर्णबधिर एकात्म विभागाच्या आश्विनी राऊत आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन भगवान पांडेकर व आभार प्रदर्शन गौतम मगरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्या मेधा सिन्नरकर यांनी मार्गदर्शन केले.






