आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मोदींचा टोला

पुणे : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पुण्याच्या विकासात महत्त्वाच्या योगदान असणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन करण्याची संधी आज मिळाली. पुणे मेट्रोचे भूमिपूजनासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले यासाठी पुणेकरांचा आभारी आहे. याआधी भूमिपूजन होत असे पण प्रकल्प कधी पूर्ण व्हायचे हे कळायचे नाही. पण, आता भूमिपूजन केले जाऊ शकते आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. समाजातील सर्वच घटकांनी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आहे. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी केले. त्यानंतर तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर, हेमंत रासने, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आदी उपस्थित होते.



