किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे : कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात सलोख्याचे संबंध असले की उद्योगाची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही.कमिन्स कामगारांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे मत सेवानिवृत्त फॅक्टरी मॅनेजर पी. पी. शहा यांनी व्यक्त केले.
किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५१ वा वर्धापनदिन नुकताच संघटनेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी व्यवस्थापनाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी शिरीष भिडे यांनी सध्याच्या परिस्थितीत आपल्या कंपनीसमोरील आव्हानांचा आढावा मांडला,तसेच राजेंद्र कुलकर्णी, अजित तलरेजा,आदेश शेठ, जेनिव्हीव कौल यांनी मनोगत व्यक्त केले.
9 ऑगस्ट 2021 ते 8 ऑगस्ट 2022 या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या 12 कामगारांना संघटनेच्यावतीने रु 20,000/- ( वीस हजार रुपये) चा धनादेश, शाल व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच नोकरी सांभाळून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. दत्ता कोहिनकर, कामगार भूषण राजेंद्र वाघ, गुणवंत कामगार संजीव माने, जितेंद्र साळुंखे, गुणवंत कामगार संजय गोळे, मनोज खटावकर,परशुराम धोत्रे, धर्मराज वाघ,रविंद्र रायकर, संतोष जाधव, संतोष इनामदार, विलास दसवडकर, राजहंस मेहंदळे, अशोक बोडके, विनायक देशमुख, मनिषकुमार चवरे ,अनिल घोडेकर या 17 कामगारांना विशेष प्राविण्य पुरस्काराने स्मृतीचिन्ह , शाल व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच सेवेची 25 वर्षे पूर्ण झालेल्या 34 कामगारांना 100 ग्रॅम चांदीचे नाणे ,शाल व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या सुखाचा पासवर्ड या ग्रंथाचे प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुखाचा पासवर्ड हे पुस्तक मान्यवरांना सप्रेम भेट देण्यात आले. डॉ. दत्ता कोहिनकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमात उपाध्यक्ष सुधीर उर्फ बापू सरोदे यांनी प्रास्ताविक केले, संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांनी आपल्या भाषणात संघटना यानात्याने कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जबाबदारी म्हणून केलेल्या कार्याचा तपशील मांडला. व्यासपीठावर सँडविक एशिया संघटनेचे अध्यक्ष संतोष कणसे तसेच संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार राम शरमाळे हे उपस्थित होते. गुणवंत कामगार एकनाथ पिंगळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले .मेंटेनन्स विभागाचे संदीप साळुंखे यांच्या स्वरा या मुलीने सुश्राव्य आवाजात पसायदान सादर केले. उपाध्यक्ष गुणवंत कामगार संजीव माने यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.












