ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदीचं निधन

मुंबई : पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास. अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुलोचना दीदींचं निधन झालं. उद्या सायंकाळी ५ वाजता दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी अभिनय कौशल्याने ठसा उमटवला त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. सन १९४३ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री / घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.







