कोथरूडमधील मेट्रो मार्गिकेला ‘राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मेट्रो मार्ग’ तर आयडीयल कॉलनी स्टेशनला ‘केळेवाडी मेट्रो स्टेशन’ नाव द्यावे – दीपक मानकर

पुणे : पौड फाटा ते वनाज या मेट्रो मार्गिकेला ‘राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब मेट्रो मार्ग’ असे नाव देण्यासोबतच आयडीयल कॉलनी मेट्रो स्टेशनला ‘केळेवाडी मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे. याबाबत नगरसेवक दीपक मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने महा मेट्रोला निवेदन देण्यात आले आहे.
दीपक मानकर म्हणाले महामेट्रो कॉर्पोरेशनचा २ रा फेज वनाज ते रामवाडी असा आहे. नुकतेच या मेट्रोचे लोकार्पण होऊन वनाज ते गरवारे कॉलेज असा प्रवास सुरु झालेला आहे. परंतू पौड फाटा ते वनाज या मेट्रो मार्गाचे नाव पौड रस्ता मेट्रो मार्ग असे ठेवण्यात आली असल्याची चर्चा आहे. मात्र मुळातच पौड फाटा ते चांदणी चौक या रस्त्याचे नाव आम्ही महापालिकेत केलेल्या ठरावानुसार राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मार्ग’ असे करण्यात आलेले आहे. त्यामुळे पौड फाटा ते वनाज या मेट्रो मार्गीकेचे नाव ‘राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब मेट्रो मार्ग’ असे करावे व मेट्रो पिलरवर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा संपूर्ण जीवन प्रवास साकारण्याची आम्हा शिवप्रेमींची आग्रहाची मागणी आहे.

हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, या मार्गावर असणारे आयडीयल कॉलनी मेट्रो स्टेशन हे आयडीयल कॉलनीपासून खुप दुर अंतरावर आहे. त्यामुळे प्रवाश्यांची हि दिशाभुल होत आहे. सदरील आयडीयल कॉलनी मेट्रो स्टेशन हे केळेवाडी परिसरात आहे. त्यामुळे या स्टेशनचे नाव बदलुन ते ‘केळेवाडी मेट्रो स्टेशन’ करण्यात यावे. अशी मागणी आम्ही केली आहे. महामेट्रो प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दीपक मानकर व हर्षवर्धन मानकर यांनी दिला आहे.






