राष्ट्रीय

महागाईने 10 वर्षातील विक्रम मोडला; घाऊक महागाईचा दर 15.08 टक्के

पुणे : महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित होऊ लागले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक आहे.

मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) १३.११ टक्क्यांवर होता. तर मार्चमध्ये हाच निर्देशांक १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक १०.७४ टक्के इतका होता. विशेष म्हणजे मागील १३ महिन्यांपासून घाऊक महागाई दर दोन अंकी नोंदला आहे. त्यामुळे देशात महागाईचं संकट किती भीषण रुप घेत आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ आणि रसायनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिल महिन्यात महागाई दर वाढला असल्याचं सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांवरील महागाईचा दर ८.३५ टक्के नोंदला आहे. हाच दर मार्च महिन्यात ८.०६ टक्के इतका होता. भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने खाद्यपदार्थांवरील महागाई दर वाढला असल्याचं संबंधित अहवालात म्हटलं आहे.

एप्रिलमध्ये भाज्यांचा महागाई दर २३.२४ टक्के नोंदला आहे, हा दर मार्चमध्ये १९.८८ टक्के इतका होता. एप्रिल महिन्यात बटाट्याचे भाव १९.८४ टक्क्यांनी वाढले तर कांद्याचे भाव ४.०२ टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच फळांचा महागाई दर मार्चमध्ये १०.६२ टक्के होता. एप्रिलमध्ये हा दर १०.८९ टक्क्यांपर्यंत वाढला. दुसरीकडे, गव्हाच्या किमतीत देखील १०.७० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. तसेच अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीतही ४.५० टक्क्यांची वाढ नोंदली आहे.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये