पुणे शहर

‘एसटी’ चालकाने मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून वाचवले 25 प्रवाशांचे प्राण

पुणे : अचानक हृदयविकाराचा झटका आला असतानाही मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून ‘एसटी’ चालकाने 25 प्रवाशांना वाचवल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली आहे. जालिंदर पवार असं या 45 वर्षीय एसटी चालकाचं नाव आहे. दुर्देवाने या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत एसटी बस आल्यानंतर चालक जालिंदर रंगराव पवार (वय 45, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) यांना चक्कर आली. ते म्हसवड सातारा येथे बस घेऊन चालले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्यानंतर वरवे गावाच्या हद्दीत बस आली असताना बसचा वेग मंदावला. वाहक संतोष गवळी यांनी त्यांना तुम्हाला काय होतंय अशी विचारणा केली. त्यावेळी पवार यांनी वाहक गवळी यांना आपल्याला चक्कर येत असल्याचे सांगितले. पवार यांनी बस व्यवस्थित बाजूला घेत स्टेअरिंगवरच डोके ठेवले आणि प्राण सोडले.

वाहक गवळी यांनी तुम्हाला काय होतंय असं विचारलं असता पवार काही प्रतिसाद देत नव्हते. वाहक गवळी यांनी प्रवाशांच्या मदतीने पवार यांना बाजूला नेले. स्वतः बस चालवत नसरापूर येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये ते पवार यांना घेऊन गेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

जालिंदर पवार हे बदली चालक म्हणुन आले होते. वसई येथुन बस दुपारी साडेबारा वाजता स्वारगेट येथे आल्यावर तेथुन पुढे पवार यांनी बस चालवण्यासाठी घेतली. खेड शिवापुर टोलनाका पार केल्यावर ते काहीसे अस्वस्थ झाले. त्यामुळे बसचा वेग मंदावला होता. वरवे गावच्या हद्दीत आल्यावर त्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांनी बस बाजुला घेतली. याचवेळी हृदयविकाराच्या जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले परंतु त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले. महामार्गावर बसवरील नियंत्रण गेल्याने मोठा अपघात झाला असता ही दुर्घटना पवार यांच्या समयसुचकतेमुळे टळली. या घटनेबाबत वाहक संतोष गवळी यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी याची नोंद घेऊन शवविच्छेदनानंतर मृतदेह पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Fb img 1647413711531
Img 20220801 wa0304

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये